
उर तटतटून यावा आईचा अन चांदण्याचा निसटावा थेंब...
तसा टपटपतो पाऊस उस्फुर्त ...अनावर
ते इवले इवले तान्हुले थेंब पानाच्या कडांना लुचतात
अन अख्खं झाड पान्हावत आतून बाहेरून...
तीओल जेव्हा आत खोल देठापर्यंत पोहोचते
तेव्हा झाडाचे डोळे साधर्म्य सांगतात
माझ्या आईच्या वास्तल्य वेल्हाळ डोळ्यांशी
पागोळ्यांच्या मुंडावळ्या बांधलेली कौलारू घर
जगाशी संपर्क तोडून स्वत:तच मश्गुल होऊन जातात
नवीन लग्न झालेल्या जोडप्यांसारखी...
घराच्या गळक्या कौलातून सांडलेला पावसाचा चुकार थेंब
बिनदिक्कत सलगी करू पहातो घरातल्या जमिनीशी
तेव्हा घरातले सारे संस्कृतिरक्षक
तातडीची बैठक बोलावतात यावर उपाय योजण्यासाठी
विज परागंदा होते दूर देशी
अन टेलीफोन जेव्हा शांततेशी गप्पा मारत बसलेला असतो
तेव्हा ज्योतीजवळ साठलेला काळा गारठा दूर सारण्याचा...
केविलवाणा प्रयत्न चालू असतो दिव्याचा
मुंग्या साठवत असतात आपल्या चिमुकल्या घरात
चिमुकले साखरेचे स्फटिक
अन वेडा पावश्या तल्लीन होवून
वेचत असतो मृगाचे कृष्ण कवडसे
तेव्हा अंधाराच्या सीमारेषेवर हिंदकळणारे
एखादे स्वप्नाळू जोडपे ...
आपल्या काजळ डोहात,
भरून घेत असतं तुडुंब पाऊस
पुढचे वर्षभर पुरवून पुरवून वापरण्यासाठी
....कैलास गांधी