Monday, June 28, 2010

खासदारांची खंत...

लोकशाहीच्या सुभेदारांचा
असा पवित्रा नवा आहे
लोकसेवक वेतन म्हणून
सहावा आयोग हवा आहे

वरकमाईवर म्हणे आता
फक्त आमचे भागत नाही
कार्यकर्ता पोसला तरी
खाल्ल्या मिठाला जागत नाही

....कैलास गांधी

Wednesday, June 16, 2010

भोपाळ चा न्याय ?

राजीव असो वा मनमोहन
तीच ती कथा आहे
कौरवांना सामील 'अर्जुन'
हीच खरी व्यथा आहे
खटल्याच्या निकालानंतर
अहवालाची मागणी आहे
२५ वर्षाच्या जखमांवर
१० दिवसांनी डागणी आहे

....कैलास गांधी

Tuesday, June 8, 2010

मग कोंब कुण्या सृजनाचा माझ्यात अंकुरत असतो...

दररोज स्व:ताला काही मी प्रश्न विचारात असतो
का खुड्लेल्या फांद्यांना अंकुर उगाचच फुटतो

विसरायचे आहे त्याला आधी घडलेले त्याला
तो लाख ठरवतो आणि मागचे उगाळत बसतो

या मातीमध्ये म्हणता रुजणारच नाही काही
मग कोंब कुण्या सृजनाचा माझ्यात अंकुरत असतो

...कैलास गांधी

Sunday, June 6, 2010

धीर कधीना खचला तरीही या सत्याची जाणीव झाली

ज्याच्या नाराजीने सध्या नवीन वादळ उठले होते
हे शोधा कि आधी त्याचे किती जणांशी पटले होते

बाग जरा नाखुशच होती फुलांनीच समजोता केला
नव्या ऋतूंची वाट पाहुनी रंग फुलांचे विटले होते

पाय मोकळे झाल्यावरती उभा राहिला नवाच गुंता
सुटे, मोकळे होण्यामध्ये हात जरा गुरफटले होते

पुसू नका आरसे उगाचच तोंडावर मारत जा पाणी
रोज नव्या रंगानी मुळच्या चेहऱ्यांना बरबटले होते

जीवानिशी जे गेले त्यांच्या मृतदेहांना नाही वाली
लाड तयांचे झाले ज्यांना थोडेसे खरचटले होते

धीर कधीना खचला तरीही या सत्याची जाणीव झाली
शरीर थोडे थकले होते... पाय जरासे दमले होते

....कैलास गांधी

Thursday, June 3, 2010

माणसांच्या भावनांचे तेच ठेकेदार झाले...

पेटले सोयी प्रमाणे आणि नंतर गार झाले
माणसांच्या भावनांचे तेच ठेकेदार झाले

पावसाळी हि तरुंना येईना फुटवा परंतु
जंगलातील बंगल्यांचे वृक्ष डेरेदार झाले

प्राण जाईतो कुणाला लागला नाहीच पत्ता
लोक होते झोपले कि वार हि हळुवार झाले

जन्मदात्यांनाच ज्यांनी लावले देशोधडीला
कायद्याने पण तरीही तेच वारसदार झाले

संधिसाधू दांभिकांची जाहली पुन्हा आघाडी
काळजीवाहू म्हणाया बेगडी सरकार झाले

बोलले काही तरी पण भाविकांना अर्थ कळतो
हे जसे कळले तयांना तेच मग अवतार झाले

येथल्या पोकळ वीरांना राहिली लागून चिंता
गायचा इतिहास कोणी शब्द जर तलवार झाले

......कैलास गांधी