Showing posts with label kavi. Show all posts
Showing posts with label kavi. Show all posts

Saturday, December 5, 2009

हवा पावसाळी


असा गार वारा... हवा पावसाळी
तुझ्या आसवांची हले का? डहाळी


असा कोणता गंध ये आसवांना
मनातून कोणी रुजुवात पाहे
पुन्हा कोंब येती नव्याने बीजाला
मुळामागुनी मूळ निशब्द धावे...
गती येत जाते तुझ्या चिंतनातून...
जुन्या वेदनांना नवी पालवी...


अशी शिळ घाली कोणी मनातून
निळा मेघ सांगे तुझा वारसा
खरे काय ते फक्त डोळ्यास ठावे
तुझा चेहरा हा मला आरसा
नदी खोल धावे ओलावणारी
आणि होत जाती उन्हे कोवळी
- कैलास गांधी

Friday, November 6, 2009

आत्महत्या




आत उधाणलेला दर्या...
आणि पापण्यांची गलबतं
नांगर सोडण्याच्या तयारीत
हा आत्महत्येचा संकल्प म्हणावा
की हाराकिरी!

हे ठरवण्याआधी... मी चालू लागतो
.... समुद्राच्या दिशेने




तर किनाऱ्यावर...

नक्षीदार पायघड्या पसरलेल्या खेकड्यांनी

.................
ही माझ्या स्वागताची तयारी म्हणावी की,
मला वाचवण्याचा केलेला शेवटचा अट्टाहास


हे मला ठरवता येत नाही
मी थोपवू शकत नाही...


दूर सीमेपलीकडून येणाऱ्या हाका
हाकांमागून येणारी आमंत्रणे...
आणि घरातल्या मांजरीसारखी...

.. दररोज पायात लुडबुडणारी स्वप्ने
आणि तरीही मी अस्वस्थ होत नाही॥


ही माझ्या मेलेपणाची जाणीव म्हणावी की....


- कैलास गांधी

Monday, October 12, 2009

बारामतीचे हत्ती आणि सुळे


बारामतीतील हत्तींना म्हणे
घराणेशाही खपत नाही
खायचे दात लपवले तरी
बाहेरचे सुळे लपत नाहीत

-कैलास गांधी

ना-'राज' ठाकरे


साहेब म्हणाले,
हे खरे तर उद्धवाचे राज आहे
आधी मुलगा... मग पुतण्या...
...त्यानंतर समाज आहे
कोण म्हणते भगव्याला
विरक्तीचा शाप आहे
वारस कसा रक्ताचा हवा
केवढा मोठा 'व्याप' आहे

- कैलास गांधी

मी छंदी फंदी...


मी छंदी फंदी...दु:खात आनंदी
...माणसांच्या रानात मला बंदी

मी
लुच्चा, लफंगा, चोर, बदमाश
...बेवडा मी
तुझ्या वेणीत माळलेला घमघम
...केवडा
मी

मी सांज उषेच्या किरणांनी
विणतो शाल दिवसाची
मी रात्रीस बायको म्हणतो
संध्येस रखेल दिवसाची

मी
काळोखाच्या गर्भात
उजेडाच्या खडूने लिहीतो
मी सटवीच्या भाळावर
उद्याचे भविष्य
लिहितो

मी हात जोडतो सुर्यास
अन् म्हणतो जाळ मला
सागरास मारतो मिठी
अन् म्हणतो सांभाळ
मला

मी कोणत्या अनामिक आवेगाने
काळजात ठोकतो खिळा
ही भूक कोणती अशी
आतड्यास द्या म्हणे
पिळा

ह्या
कळा घेउन युगांच्या
मी काट्यांच्या चालतो वाटा
काट्यास शोधती पाय
की पायास शोधतो काटा


मी शिंपून धर्मबिंदू
शमवतो तहान रक्ताची
मी विठ्ठलास गडी म्हणतो
रुक्मिणीस दासी भक्ताची

मी छंदी फंदी...दु:खात आनंदी
...माणसांच्या रानात मला बंदी


-कैलास गांधी