Showing posts with label कविता.कवि कैलास. Show all posts
Showing posts with label कविता.कवि कैलास. Show all posts

Wednesday, April 28, 2010

युगायुगांची कासावीस अशी वळवाने सरते का?....


कर्जमाफीच्या आमिशावर अशी माजली शेते
पाउस पडला नाही तरीही पिक भुकेचे येते

कुपोषणाचा अर्थ कळाया उपोषणाला बसली
मातीच्या गर्भात अकाली जन्म जाहली शेते

किती गचकली पाण्यावाचून गणती कोणी केली
संख्या फुगवून सांगत गेले किती वाचली शेते

अनुदानाच्या थापा ऐकून अता शहाणी झाली
किती कुणाचे टक्के असतील शोध लावती शेते

युगायुगांची कासावीस अशी वळवाने सरते का?
रक्ताचे मग पाणी करुनी आम्ही शिंपली शेते

.....कैलास गांधी

Saturday, April 3, 2010

हिंडतो बिनधास्त मी चेहराच नसल्यासारखा....

आता कुठे माझी मला ओळख झाल्यासारखा
हिंडतो बिनधास्त मी चेहराच नसल्यासारखा

मी फक्त आहे बुडबुडा इथल्या हवेचा हे खरे
असून नसल्या सारखा, दिसून फुटल्यासारखा

मी कधीचा ताटकळतो त्याच त्या जागेवरी, पण
धावतो रस्ता नव्याने, हा पाय फुटल्यासारखा

जाळ सोसुनी चुलीचा माय आहे रापली पण,
चेहरा दिसतो अजुनी तांदूळ धुतल्यासारखा

....कैलास गांधी

Thursday, April 1, 2010

कार्यकर्ते आणखी नेते खुजे पण....

उंदराला मांजराची साक्ष आहे
भामट्याचे चोरट्यावर लक्ष आहे

कार्यकर्ते आणखी नेते खुजे पण
कीर्ती त्याची फार मोठा पक्ष आहे

धान्य हा तर दारूसाठी माल कच्चा
कडबा हेच माणसाचे भक्ष आहे

देवघेवीचे चला बोलून टाकू
त्याचसाठी वेगळा हा कक्ष आहे

....Kailas Gandhi

Wednesday, March 31, 2010

देवघेवीचे चला बोलून टाकू....

उंदराला मांजराची साक्ष आहे
भामट्याचे चोरट्यावर लक्ष आहे

कार्यकर्ते आणखी नेते खुजे पण
कीर्ती त्याची फार मोठा पक्ष आहे

धान्य हा तर दारूसाठी माल कच्चा
कडबा हेच माणसाचे भक्ष आहे

देवघेवीचे चला बोलून टाकू
त्याचसाठी वेगळा हा कक्ष आहे

Friday, March 19, 2010

योगायोगाची गोष्ट....



योगायोगाने त्यांना
आसने जमू लागली
कपालभातीच्या तालावर
साधनाही घुमू लागली
नंतर कळले साधकांना
त्यांचे, वेगळीकडे लक्ष्य आहे
त्यांच्या अदभूत पोटात सुद्धा
राजकीय 'भक्ष्य' आहे

...कैलास गांधी

Wednesday, March 17, 2010

त्यांच्याही दारी... गुढी


त्यांच्याही दारी... गुढी
जयांची... पिढी
अजुनी शिडी ...शोधते आहे.
बापाच्या हाती ...विडी
होवुनी.... गडी
मायही खडी...फोडते आहे.


...कैलास गांधी

Tuesday, February 16, 2010

मी छंदी फंदी..

मी छंदी फंदी...दु:खात आनंदी
...माणसांच्या रानात मला बंदी

मी लुच्चा, लफंगा, चोर, बदमाश
...बेवडा मी
तुझ्या वेणीत माळलेला घमघम
...केवडा मी

मी सांज उषेच्या किरणांनी
विणतो शाल दिवसाची
मी रात्रीस बायको म्हणतो
संध्येस रखेल दिवसाची

मी काळोखाच्या गर्भात
उजेडाच्या खडूने लिहीतो
मी सटवीच्या भाळावर
उद्याचे भविष्य लिहितो

मी हात जोडतो सुर्यास
अन् म्हणतो जाळ मला
सागरास मारतो मिठी
अन् म्हणतो सांभाळ मला

मी कोणत्या अनामिक आवेगाने
काळजात ठोकतो खिळा
ही भूक कोणती अशी
आतड्यास द्या म्हणे पिळा

ह्या कळा घेउन युगांच्या
मी काट्यांच्या चालतो वाटा
काट्यास शोधती पाय
की पायास शोधतो काटा

मी शिंपून धर्मबिंदू
शमवतो तहान रक्ताची
मी विठ्ठलास गडी म्हणतो
रुक्मिणीस दासी भक्ताची

मी छंदी फंदी...दु:खात आनंदी
...माणसांच्या रानात मला बंदी

-कैलास गांधी

Wednesday, January 27, 2010

भिवंडीतून दवंडी...



मराठी द्वेषी तोंडावर
महाराष्ट्र थुंकणार आहे
भिवंडीतून दवंडी आहे
मराठी माणूस जिंकणार आहे
अबू आझमी तरी म्हणतो
अजून मी भुन्कणार आहे

....कैलास गांधी

Wednesday, January 20, 2010

बारामतीच्या ज्योतिषावर...


डायबिटीस पेशंटला
नवीन दिलासा आहे
साखर कमी करण्याचा
नवीन खुलासा आहे
बारामतीची वारी केल्यास
'पवार वैद्य' भेटतील
शुगर कमी करण्याचे
उपाय देखील पटतील
बारामतीच्या ज्योतिषावर
काय दिवस आलेत
पंतप्रधान बनता बनता
नुसते factor झालेत

....कैलास गांधी

Monday, December 28, 2009

राजभवनातील रासलीला...



'पान' पिकले तरीही म्हणे
देठ अजून काबूत आहे.
'वारी' करायच्या वयात त्यांची
'ती' सवय शाबूत आहे.

म्हणून त्यांनी राजभवनाचा
रंगमहाल केला.
मिडीयाने उगाच याचा
गाजावाजा केला.
काय चुकले त्यांचे सांगा
सवाल माझा मार्मिक आहे.
नारायण, दत्त...असे त्यांचे
नाव सुद्धा धार्मिक आहे.

....कैलास गांधी

Wednesday, December 23, 2009

कि कुशीत या झाडाच्या....


पानाच्या पाटीवरती किती रेघोट्या नि रेषा
पानावर लिहिली असते पक्षांची बोलीभाषा

पानाची ओंजळ होता सावरतो थेंब दवाचा
कि कुशीत या झाडाच्या वाढतो वंश मेघाचा

पानाचे अंबर हलता सावल्यांचा गलका होतो
विखुरतो थोडा वेळच मग पुन्हा घोळका होतो

आईन्यात पानाच्या पक्षास गवसला चेहरा
साऱ्याच वाटल्या त्याला आपल्यावर खिळल्या नजरा

पानाच्या जाळ्यामधुनी निसटतो उन्हाचा धागा
बघ प्रकाश हि हक्काने सावलीत मागतो जागा

......कैलास गांधी

Monday, December 14, 2009

बोलतो शब्द वेडा मी....




बोलतो शब्द वेडा मी
बोलतो शब्द थोडा मी
थोडाच बोलतो तरीही
मन हलके हलके होते

अंगणात येते रात
अन चंद्र घराच्या आत
श्वासात मिसळता श्वास
देहात चांदणे विझते

ओढाळ वाहतो ओढा
चौखूर दमाचा घोडा
दगडात अडखळे थोडा
मग पुन्हा येई जोसात

मग पाय फुटे वाटांना
स्वप्नात दूर जाताना
भेटता उजेड थोडा
अंधार जाणता होतो

....कैलास गांधी

Monday, November 9, 2009

श्रावणभूल


वाऱ्याची घुमते शिळ...
तसा घननीळ... वाजवी पावा
झरझर जातसे सर...
डोंगराआड कोणत्या गावा

बेभान होतसे वारा
घाली येरझारा...वेड्यावाणी
झाडास भरतसे चाळा
वाजवी टाळ्या... पानोपानी

पक्षांच्या चालल्या ओळी
खाली रांगोळी... सावल्यांची
ओढ्याची चालू खळखळ
कि बोलतो...बाळ पाळण्याशी

संन्यस्थ उभा तो वड
नदीकाठाड... वाकलेला
पारंबी खेळतो पक्षी
रंग गुलबक्षी... माखलेला

हलकेच येतसे उन
डोळे मिचकून... धुंद नाचे
नदीस लागले खूळ
शोधते मूळ... सागराचे

काळजात उतरली ओळ
जातसे तोल... सावरेना
धुक्यात हरवला गाव
शोधूनी ठाव... सावरेना


- कैलास गांधी