Showing posts with label कविता. Show all posts
Showing posts with label कविता. Show all posts

Wednesday, January 20, 2010

सारी संपली तहान...



पाऊस पडतो रानात
पाऊस पडतो पानात
कुणी गुपचूप काही
सांगे हळूच कानात

पाऊस पडतो रानात
फोडतोही डरकाळी
गारठल्या पाखरात
थोडी कुजबुज झाली

पाऊस पडतो रानात
पसरून नभी पंख
कधी थंड शिडकावा
कधी जहरीला डंख

पाऊस पडतो रानात
गंध गंध दरवळतो
कुणा घेवून मिठीत
कुणी दिवे मालवतो

पाऊस पडतो रानात
सारे ओले चिंब रान
सारे कसे निपचित
सारी संपली तहान

.....कैलास गांधी

Saturday, November 7, 2009

प्रेम म्हणजे


जाणीवेच्या पुस्तकातील हळव पान
....म्हणजे प्रेम
नेणीवेचा वणवा शिल्लक रान
....म्हणजे प्रेम
प्रेम म्हणजे....
.. डोंगर,..झाड,...पान,..पुस्तक,..शाई..
प्रेम म्हणजे गुंता नुसता
.....सुटतच नाही

- कैलास गांधी