Thursday, November 12, 2009

वादळानंतर दापोली....


वादळानंतर दापोलीची पडझड झाली तरीही पुन्हा नव्याने उभे राहण्यासाठी प्रत्येक जण कार्यरत झाला. अनेक मदतीचे हात पुढे आले. जनजीवन पूर्णपणे सुरळीत झाले नाही तरी पुन्हा नव्या सुरुवातीला सुरुवात झाली. अशावेळी माझ्या प्रकाश सावंत या कवी मित्राची कविता आठवली
कर तांडव सांडव महापूर अश्रूंचा
उधळून तक जा जीवनपट तू आमचा
वलयांकित होवुनी प्रलय देवूनी जा तू
कर दिशाहीन अन क्षितिजे घेवून जा तू
जमवण्या पुन्हा बघ सहस्र कर हे उठले
नमवण्या तुला बघ अंकुर कितीदा फुटले
आम्ही पुन्हा उभारू दिशा नव्या... क्षितिजे नवी
उदयास यावया वाट पाहतो रवी

Wednesday, November 11, 2009

दापोलीची वाताहात




दापोलित आज आलेल्या वादळ वारयाने दापोलीची वाताहत झाली.नैसगिक आपत्तिपासून सुरक्षित समजल्या जानारया दापोलिला आज तब्बल १८ वर्षानी पुन्हा तडाखा बसला.अनेक ठिकाणी झाडे कोसळल्याने वाहतुक बंद झाली होती. तालुक्यात अनेक घरांवर झाडे पडल्याने करोडोंची वित्तहनी झाली. विजेचे खांब जागोजागी कोसळल्याने . विज यंत्रणा सुरक्षित होण्यासाठी दोन दिवस लागण्याची शक्यता आहे. दापोली बाज़ार पेठेतुंन जाणाऱ्या मार्गावर झाडे कोसळल्याने बाज़ार पेठ आज दिवसभर बंद होती. वायरलेस यंत्रणेचा टॉवर कोसळल्याने पोलिसांची वायरलेस यंत्रनाही कोलमडली.कोणतीही जीवित हानी झालेली नसली तरीही करोडो रुपयांची वित्त हानी झाली आहे।सुमारे ५०० घरांना धोका पोहोचला आहे. याचे सर्वेक्षण करण्यासाठी दोन दिवसाचा कालावधि लागणार असल्याची माहिती तहसील कार्यालयातून देण्यात आली आहे. तालुक्यात सुमारे १५०० हुन अधिक झाडे कोसळली आहेत.

Tuesday, November 10, 2009

सांगून टाक तू...


सांगून टाक तू काय आपुले नाते
का उगा मनाचा तळ उसवत जाते...
घेवूनी समाधी जरी पहुडलो येथे
हि झुळूक तुझी पण प्राण फुंकुनी जाते...

मी विसरत जातो संदर्भ तुझे नि माझे
तर पुन्हा ठोकती आठवणी दरवाजे
प्रत्येक आठवण मनात अडकत रहाते
सांगून टाक तू काय आपुले नाते...

वेदनेस अचानक जीव होतसे परका
श्वासात गुदमरे तरीही निखारा जळका
पेटते न काही नुसते धुमसत जाते
सांगून टाक तू काय आपुले नाते....

- कैलास गांधी

Monday, November 9, 2009

श्रावणभूल


वाऱ्याची घुमते शिळ...
तसा घननीळ... वाजवी पावा
झरझर जातसे सर...
डोंगराआड कोणत्या गावा

बेभान होतसे वारा
घाली येरझारा...वेड्यावाणी
झाडास भरतसे चाळा
वाजवी टाळ्या... पानोपानी

पक्षांच्या चालल्या ओळी
खाली रांगोळी... सावल्यांची
ओढ्याची चालू खळखळ
कि बोलतो...बाळ पाळण्याशी

संन्यस्थ उभा तो वड
नदीकाठाड... वाकलेला
पारंबी खेळतो पक्षी
रंग गुलबक्षी... माखलेला

हलकेच येतसे उन
डोळे मिचकून... धुंद नाचे
नदीस लागले खूळ
शोधते मूळ... सागराचे

काळजात उतरली ओळ
जातसे तोल... सावरेना
धुक्यात हरवला गाव
शोधूनी ठाव... सावरेना


- कैलास गांधी

पाऊस पडतो




पाऊस पडतो थेंब थेंब पण
काळजास या दुखवित जातो
जखमांमध्ये खोल खोल अन
हिरवे काही रुजवीत जातो

-कैलास गांधी



Saturday, November 7, 2009

प्रेम म्हणजे


जाणीवेच्या पुस्तकातील हळव पान
....म्हणजे प्रेम
नेणीवेचा वणवा शिल्लक रान
....म्हणजे प्रेम
प्रेम म्हणजे....
.. डोंगर,..झाड,...पान,..पुस्तक,..शाई..
प्रेम म्हणजे गुंता नुसता
.....सुटतच नाही

- कैलास गांधी

Friday, November 6, 2009

आत्महत्या




आत उधाणलेला दर्या...
आणि पापण्यांची गलबतं
नांगर सोडण्याच्या तयारीत
हा आत्महत्येचा संकल्प म्हणावा
की हाराकिरी!

हे ठरवण्याआधी... मी चालू लागतो
.... समुद्राच्या दिशेने




तर किनाऱ्यावर...

नक्षीदार पायघड्या पसरलेल्या खेकड्यांनी

.................
ही माझ्या स्वागताची तयारी म्हणावी की,
मला वाचवण्याचा केलेला शेवटचा अट्टाहास


हे मला ठरवता येत नाही
मी थोपवू शकत नाही...


दूर सीमेपलीकडून येणाऱ्या हाका
हाकांमागून येणारी आमंत्रणे...
आणि घरातल्या मांजरीसारखी...

.. दररोज पायात लुडबुडणारी स्वप्ने
आणि तरीही मी अस्वस्थ होत नाही॥


ही माझ्या मेलेपणाची जाणीव म्हणावी की....


- कैलास गांधी

रात्र अनेस्थेसिया देईपर्यंत


दिवसाचे पोस्टमोर्टम केल्यावर
हालत राहतो मेंदू...
अन काळजाचा तुकडा...
संध्याकाळच्या फोर्मिलीनमध्ये
रात्र अनेस्थेसिया देईपर्यंत...


तसे आपण सर्वच जन चालत रहातो
अपघाताने...वाट अपघाताची
रुळावरती दरडी कोसळेपर्यंत
सर्वच कसे सुखरूप असते...
रेल्वेच्या प्रवासासारखे


नाही म्हणायला
तरीही प्रत्येकजण तपासात असतो
आतली धडधड
डॉक्टरच्या स्टेथोस्कोपसारखा
...सराइतपणे


सतत वाटत राहते
आपण जिवंत असल्याची भीती
आणि होत राहतात भास
...श्वास चालू असल्याचे
........................
........................
...रात्र अनेस्थेसिया देईपर्यंत


-कैलास गांधी