Wednesday, December 23, 2009

कॅम्पस ते स्टाफरूम ...


सकाळी उठल्या उठल्या
दाताला चिकटलेले कालचे संदर्भ
toothpaste सोबत थुंकून टाकताना
काळ निसटून चालल्याची असहाय जाणीव
थरथरत राहते बोटांवर...

पगार, इन्क्रिमेंट, स्ट्रेन्थ हे सारेच प्रश्न यावर्षी सुटतील
प्राणायाम करून बाहेर पडताना कुलकर्णी सांगतो
तेव्हा त्याला वेड लागल्याची घट्ट जाणीव शिवशिवत जाते हिरड्यातून
तत्काळ रूट कॅनल केले पाहिजे मराठे सांगतो

पगारासोबत हिमोग्लोबिनही वाढले पाहिजे
या विवंचनेत रासकर शोधात राहतो परफेक्ट डायेट
botanyच्या कुठल्याश्या पुस्तकात
तेव्हा आपल्या होणाऱ्या बायकोला भेटायला जाण्यासाठी
पैसे हवे असतात मोरेला

सकाळचा नाष्ता करायचा की नाही हे सुट्या पैशावर अवलंबून असताना
रिलायंसचा दिवसाचा नफा किती याची गणिते मांडत बसतो वलेकर
आकड्यांचा आकार वाढत जातो बनियन वरील भोकांसारखा

कॉलेजला पाऊल ठेवताक्षणीच लिमायेंचे बिल आलेले असते
महिन्याचा पगार बोंबलल्याची भविष्यवाणी करतो साठे.
advance मिळेल का? आदी चिल्लर प्रश्न विरून जातात
क्लार्कच्या advance नकारात
आता आयुष्य मिळेल त्या मानधनावर सही करू लागलेय

विनाअनुदानित कॉलेजमधील शिक्षकाप्रमाणे...

...कैलास गांधी

No comments:

Post a Comment