Wednesday, January 27, 2010

भिवंडीतून दवंडी...



मराठी द्वेषी तोंडावर
महाराष्ट्र थुंकणार आहे
भिवंडीतून दवंडी आहे
मराठी माणूस जिंकणार आहे
अबू आझमी तरी म्हणतो
अजून मी भुन्कणार आहे

....कैलास गांधी

Wednesday, January 20, 2010

बारामतीच्या ज्योतिषावर...


डायबिटीस पेशंटला
नवीन दिलासा आहे
साखर कमी करण्याचा
नवीन खुलासा आहे
बारामतीची वारी केल्यास
'पवार वैद्य' भेटतील
शुगर कमी करण्याचे
उपाय देखील पटतील
बारामतीच्या ज्योतिषावर
काय दिवस आलेत
पंतप्रधान बनता बनता
नुसते factor झालेत

....कैलास गांधी

सारी संपली तहान...



पाऊस पडतो रानात
पाऊस पडतो पानात
कुणी गुपचूप काही
सांगे हळूच कानात

पाऊस पडतो रानात
फोडतोही डरकाळी
गारठल्या पाखरात
थोडी कुजबुज झाली

पाऊस पडतो रानात
पसरून नभी पंख
कधी थंड शिडकावा
कधी जहरीला डंख

पाऊस पडतो रानात
गंध गंध दरवळतो
कुणा घेवून मिठीत
कुणी दिवे मालवतो

पाऊस पडतो रानात
सारे ओले चिंब रान
सारे कसे निपचित
सारी संपली तहान

.....कैलास गांधी

हे तुला कुणी तरी सांगायला हवे ...

हे तुला कुणी तरी सांगायला हवे
घाव जरी कोवळे जपायला हवे
सारखी मीच का उत्तरे शोधायची
प्रश्न काही तू सुद्धा सोडवायला हवे
....कैलास गांधी

जागवाया जे मला...



जागवाया जे मला होते निघाले
डोळे त्यांचे आंधळे खोटे निघाले
लिहिले कैलास तसे खूप त्यांनी
शब्द त्यांचे फक्त वांझोटे निघाले

... कैलास गांधी

Saturday, January 16, 2010

जरी असून आंधळा मी....



हा कशा अंधारचाळा हि कशाला कृष्णखोडी
सराईत आंधळा मी सापळ्यातून वाट काढी

हि सुखाची झोपडी कि श्वापदांची मोहमाया
आत पाऊल टाकले तो ते म्हणाले: झाले निघाया

हा कुणी माझ्यातला का असा चेकाळतो
मी म्हणे हि कृष्णवेळा तो दुपार जाळतो

का असे रे बंदी केले पावलांना मोकळ्या
घातली ती पैंजणे कि चांदी साखळ्या

काजळी दिठीत माझ्या चंद्रमा तेजाळतो
जरी असून आंधळा मी रात्र रात्र जागतो

......
कैलास गांधी

Tuesday, January 5, 2010

धान्यापासून दारू.आणि लंगोटीतला कोंकण!



काजू पासून दारू नको
धान्यापासून काढली पाहिजे
महसूलाची आवक फक्त
. महाराष्ट्रात वाढली पाहिजे.

कोकण विकासाच्या नावाखाली
दुषित प्रकल्पांची भिक आहे
इकडे आंबा करपतोय
तिकडे हिरवे पिक आहे

असच चालू आहे म्हणून
विदर्भाला खंत आहे
लंगोटीतला कोंकण मात्र
अजूनही शांत आहे

विदर्भाप्रमाणे कोंकणचा
अनुशेष जरी भरणार नाही
अंतू बर्वा तरीही म्हणतो
आत्महत्या करणार नाही

....
कैलास गांधी

Monday, January 4, 2010

दुख: देखणे माझे सुंदर....



दुख: देखणे माझे सुंदर हळूहळू जे छळते आहे
कुणा ठावे वात पेटली किती खोलवर जळते आहे

मला वाटले पुसून टाकल्या आपल्या मधल्या सीमारेषा
इतक्या वर्षानंतर दोघांमधले अंतर कळते आहे

तुझा कवडसा यावा म्हणुनी मीच छताला खाच मारली
उगाच म्हणती लोक आता की माझे छप्पर गळते आहे

दिसणार नाहीस आता तू पुन्हा कधीही त्या वळणावर
पाऊल माझे अजून तरीही त्याच दिशेने वळते आहे

.....
कैलास गांधी

आरशात या नक्कीच काही गडबड आहे....


रोज चालली स्वप्नांची ही तडफड आहे
समजूत माझी ही जगण्याची ही धडपड आहे

तुला भेटलो त्यास जाहला काळ पुरेसा
उरात तरीही अजून शिल्लक धडधड आहे

मेघ बरसतील कोठे निश्चित पत्ता नाही
उगाच तरीही अंदाजांची गडगड आहे

उंच वाढले वृक्ष वनातील इमारतींचे
नभात आता विमानांची फडफड आहे.

इथे कुणाला बोलायाला उसंत नाही
हाच दिलासा कवितांची तरी बडबड आहे

किती बदललो तरीही दिसतो तसाच अजुनी
आरशात या नक्कीच काही गडबड आहे

.....कैलास गांधी