Wednesday, April 28, 2010

युगायुगांची कासावीस अशी वळवाने सरते का?....


कर्जमाफीच्या आमिशावर अशी माजली शेते
पाउस पडला नाही तरीही पिक भुकेचे येते

कुपोषणाचा अर्थ कळाया उपोषणाला बसली
मातीच्या गर्भात अकाली जन्म जाहली शेते

किती गचकली पाण्यावाचून गणती कोणी केली
संख्या फुगवून सांगत गेले किती वाचली शेते

अनुदानाच्या थापा ऐकून अता शहाणी झाली
किती कुणाचे टक्के असतील शोध लावती शेते

युगायुगांची कासावीस अशी वळवाने सरते का?
रक्ताचे मग पाणी करुनी आम्ही शिंपली शेते

.....कैलास गांधी

Monday, April 19, 2010

वाघ झाले संत पाहून हिंस्र झाली मेंढरे...

प्रश्न हि नव्हते समर्पक उथळ होती उत्तरे
सारखे वाटायचे कि हे खरे कि ते खरे

परतण्याच्या पायवाटा प्राक्तनाने खोडल्या
ठेवली चित्रात शिल्लक जीर्ण झालेली घरे

लोकशाहीवर असाही सूड त्यांनी घेतला
वाघ झाले संत पाहून हिंस्र झाली मेंढरे

नाचला मनसोक्त पाऊस रे सुबत्ता यायला, पण
ध्वस्त झालो गाव सांगे पूर जेव्हा ओसरे

आगळा हा निकष लावून लोकगणना जाहली
माणसे नसतील तेथे मोजलेले उंबरे

मोकळ्या नात्यांस जेव्हा संमती होती हवी
काळजीने ग्रासले ते लग्न झाले चेहरे

चक्क आईच्या दुधाचा पाहिला व्यापार तेव्हा
गाय हि गोठ्यात नव्हती, ना तिची ती वासरे

पाहिला मी एक योगी जन्मभर जखमांसावे
वाटले न मग कधीही घाव माझे बोचरे

सापडेन मी मला हीच नाही शाश्वती पण
याचसाठी शोधतो मी अडगळी अन कोपरे

....कैलास गांधी

Tuesday, April 13, 2010

प्रश्न हा फिजूल आहे शब्द हे बेचव कसे...

धावताना तोल गेला..ठेचकाळत राहिलो
दूर ती गेली तरीही मी खुणावत राहिलो

प्रश्न हा फिजूल आहे शब्द हे बेचव कसे
पूर्ण चोथा होईतो जर अर्थ चावत राहिलो

दक्षिणेसाठी खरेतर देव त्यांनी पूजिला
जन्मभर त्यालाच पण मी देव समजत राहिलो

प्रश्न हे बोथट जणू कि, तीष्ण आली उत्तरे
बुद्धीच्या निसण्या वरी मग प्रश्न घासत राहिलो

बदलले हंगाम तरी पण खोड नाही सोडली
त्या तुझ्या इवल्या तळ्याशी रोज बरसत राहिलो

...कैलास गांधी

Thursday, April 8, 2010

उघड सांगती कविता माझ्या....

जरी उभा चांदण्यात आहे
तरी उन्हाळा उरात आहे

लग्न मोडते ज्याचे नेहमी
त्याच्या दारी वरात आहे

सरकारी नोकर ओरडला
शासन माझ्या खिशात आहे

स्वातंत्र्याने जी मोहरली
शेळी ती कुंपणात आहे

ते आता घडणारच आहे
जे काळाच्या मनात आहे

आता कुठे मी लबाड झालो
तशी सचोटी कुणात आहे

विकणे होते कधीच मंजूर
घासाघीस तर दरात आहे

लढण्याची खरी हिम्मत नाही
म्हणे दोष या कण्यात आहे

फाशीला जन्मठेप मिळते
तशी सुट कायद्यात आहे

रस्ता त्याचे आहे अंगण
छप्पर ज्याचे कनात आहे

ओलांडाया वेळ लागतो
उंचवटा उंबऱ्यात आहे

पुतळ्यासाठी प्रसिद्ध झाला
आता तो धूळखात आहे

रामाचा वनवास संपला
सीता अजुनी वनात आहे

उघड सांगती कविता माझ्या
दडून जे काळजात आहे

...कैलास गांधी

Tuesday, April 6, 2010

हा काळ हरामी मलाच गंडा घालून जातो...

वाटेत भेटतो रोज मला धमकावून जातो
हा काळ हरामी मलाच गंडा घालून जातो

घुसतेच कशी हि घरात माझ्या तिरीप कोवळी
मी रोज घराची खिडक्या दारे लावून जातो

इथे मुक्याचे नाणे कधीही वाजत नाही
फक्त बोलका भाव नेहमी खावून जातो

मी देतो शिक्षा माझ्यामधल्या अपराध्याला
जो आरोप नेहमी माझ्यावरती ठेवून जातो

मी पुढे चाललो आहे कि परतीच्या वाटेवर
हा प्रश्न सारखा तुला मला भंडावून जातो

तो फक्त जमवतो जाहिरातींचे कपटे काही
अन पत्रकार मी खुशाल तरीही सांगून जातो

मी ऋण मानतो फक्त तयाचे माथी माझ्या
तो एक कवी जो काळाला ओलांडून जातो

....कैलास गांधी

Saturday, April 3, 2010

हिंडतो बिनधास्त मी चेहराच नसल्यासारखा....

आता कुठे माझी मला ओळख झाल्यासारखा
हिंडतो बिनधास्त मी चेहराच नसल्यासारखा

मी फक्त आहे बुडबुडा इथल्या हवेचा हे खरे
असून नसल्या सारखा, दिसून फुटल्यासारखा

मी कधीचा ताटकळतो त्याच त्या जागेवरी, पण
धावतो रस्ता नव्याने, हा पाय फुटल्यासारखा

जाळ सोसुनी चुलीचा माय आहे रापली पण,
चेहरा दिसतो अजुनी तांदूळ धुतल्यासारखा

....कैलास गांधी

Thursday, April 1, 2010

कार्यकर्ते आणखी नेते खुजे पण....

उंदराला मांजराची साक्ष आहे
भामट्याचे चोरट्यावर लक्ष आहे

कार्यकर्ते आणखी नेते खुजे पण
कीर्ती त्याची फार मोठा पक्ष आहे

धान्य हा तर दारूसाठी माल कच्चा
कडबा हेच माणसाचे भक्ष आहे

देवघेवीचे चला बोलून टाकू
त्याचसाठी वेगळा हा कक्ष आहे

....Kailas Gandhi