Wednesday, March 31, 2010

देवघेवीचे चला बोलून टाकू....

उंदराला मांजराची साक्ष आहे
भामट्याचे चोरट्यावर लक्ष आहे

कार्यकर्ते आणखी नेते खुजे पण
कीर्ती त्याची फार मोठा पक्ष आहे

धान्य हा तर दारूसाठी माल कच्चा
कडबा हेच माणसाचे भक्ष आहे

देवघेवीचे चला बोलून टाकू
त्याचसाठी वेगळा हा कक्ष आहे

Friday, March 19, 2010

योगायोगाची गोष्ट....



योगायोगाने त्यांना
आसने जमू लागली
कपालभातीच्या तालावर
साधनाही घुमू लागली
नंतर कळले साधकांना
त्यांचे, वेगळीकडे लक्ष्य आहे
त्यांच्या अदभूत पोटात सुद्धा
राजकीय 'भक्ष्य' आहे

...कैलास गांधी

Thursday, March 18, 2010

गाव नाही राहिले खेड्याप्रमाणे...

माणसे ही धावती घोड्याप्रमाणे
गाव नाही राहिले खेड्याप्रमाणे

प्रश्न जर विचारले साधेच सोपे
उत्तरे देवू नको कोड्याप्रमाणे

एक झाला ज्ञानिया हे खूप आहे
वेद तू गावू नको रेड्याप्रमाणे

पाहतो मी वाट तुझ्या पावलांची
पायरीशी ठेवल्या जोड्याप्रमाणे

सागराला कोणती चढली नशाही
सारखा फेसाळतो सोड्याप्रमाणे

थांबलेली का अशी काठावरी तू
मी उथळ नाही तसा ओढ्याप्रमाणे

वाट जी जाते तुझ्या दारावरुनी
गुंतली पायात या बेड्याप्रमाणे

...कैलास गांधी

Wednesday, March 17, 2010

त्यांच्याही दारी... गुढी


त्यांच्याही दारी... गुढी
जयांची... पिढी
अजुनी शिडी ...शोधते आहे.
बापाच्या हाती ...विडी
होवुनी.... गडी
मायही खडी...फोडते आहे.


...कैलास गांधी

Friday, March 12, 2010

देव मजला टाळतो आहे कधीचा....

हि कधी का वागण्याची रीत आहे
जो तो नुसता आपल्या धुंदीत आहे

मज तुझ्या रागावण्याचा धाक नाही
मी तुझ्या या आसवांना भीत आहे

हा उगाचच शोध नाही चाललेला
थांबलेली तू मला माहित आहे

देव मजला टाळतो आहे कधीचा
तो तरी माझ्या कुठे गणतीत आहे

सौख्य भेटायास आले फुरसतीने
मी म्हणालो, मी जरा घाईत आहे

रोज तुटतो अन पुन्हा बनतो कसा मी
कोण हा मज सारखा घडवीत आहे

....कैलास गांधी

Wednesday, March 10, 2010

दे दु:खावर पुन्हा नवा मी डाग म्हणालो

मनात जे जे तुझ्या दाटले सांग म्हणालो
उधळून टाकीन तुला हवे ते माग म्हणालो

किती सांत्वने किती दिलासे विटलो जेव्हा
सहानभूतीला कर्तव्याचा भाग म्हणालो

फक्त डोलतो जो बुद्धीला गहाण टाकून
समाजास त्या गारुड्याचा नाग म्हणालो

लुटून नेले सर्वस्वाला त्या चोराने
काम संपले असेल तर मी भाग म्हणालो

अशी अचानक कशी वेदना बोथट झाली
दे दु:खावर पुन्हा नवा मी डाग म्हणालो

.....कैलास गांधी

Monday, March 8, 2010

आणि मौन माझे निकालाप्रमाणे....

तुझा शब्द भक्कम पुराव्याप्रमाणे
आणि मौन माझे निकालाप्रमाणे

नवे रोज रस्ते नव्या रोज वाटा
तरी चालतो मी सरावा प्रमाणे

जशी गर्दी वाढे तसा भाव वाढे
सुरु मंदिरेही दुकाना प्रमाणे

तशी ओढ नाही जुने वेड नाही
तरी भेटतो मी सरावा प्रमाणे

....कैलास गांधी

Thursday, March 4, 2010

माझ्यावरी नाराज मी....

माझ्यावरी नाराज मी
हे सांगू कुणा आज मी

कंठात घुमे हुंदका
नि चोरला आवाज मी

सापळ्यावर घातला
चामड्याचा साज मी

तू नदीचा हुंदका
सागराची गाज मी

वक्षात किती चांदण्या
लावतो अंदाज मी

....कैलास गांधी