Monday, December 21, 2009

गोष्ट तेव्हा पासून सुरु होते...


गोष्ट तेव्हा पासून सुरु होते
जेव्हा मी कॉलेज मध्ये शिरत होतो
प्रवेश मिळवण्या साठी या रांगेतून त्या रांगेत फिरत होतो
अश्याच एका रांगेतली मुलगी माझ्याकडे पाहून...
अगदी गोड हसली
अहो, हसली कसली...
एकदम काळजात घुसली
अन काय प्राक्तनाचा योग पहा
दोघांनाही admission मिळाली
आमच्या love mission ला जणू
भगवंताकडून permission मिळाली
एकाच वर्गात असल्यामुळे आमची ओळख वाढू लागली
तीही मग माझ्यासाठी वेळात वेळ काढू लागली
कॉलेज कॅम्पस लायब्ररीत आमच्या प्रेमगप्पा रंगू लागल्या
तेव्हा कॉलेजच्या भिंती सुद्धा आमच्या प्रकरणाने रंगू लागल्या
बापाला हे प्रकरण कळताच त्याने फार नाही ताणलं
कारण पुढे जाऊन दिवटा काय दिवे लावील ?
हे त्याने अगोदरच जाणलं

सहा महिने ठीक चालले नंतर काय झाले कुणास ठाऊक
अचानक तिने वेगळ रहाण्याचा घोष लावला
अन इथेच सरळ चाललेला शनी एकाएकी वक्री धावला
चांगलं प्रशस्त घर सोडून आम्ही छोट्याशा चाळीत राहू लागलो
पाणीटंचाईच्या काळात तांब्याभर पाण्याने न्हाऊ लागलो
आता ती हसत नाही... पूर्वी सारखं रुसतही नाही
माधुरी, मनीषा, जुही तिच्यात कुणी सुद्धा दिसत नाही
सदा रागाचं भूत तिच्या नकट्या वरती सवार असतं
दिवसभर तिचं रूप निव्वळ ललिता पवार असतं
जिच्या मुखातून सतारीचे बोल यायचे,
ते हल्ली नुसतेच तडातडा वाजते
...तरी बरं शेजाऱ्यांचा समज आहे ती फुटाणे भाजते
स्त्रीमुक्तीच्या नावाखाली तिनं कामं वाटून दिलीत
याव्यतिरिक्त कोणतंही काम... ती अजिबात करत नाही
मला उठायला वेळ झाला तर... ती पाणी सुद्धा भरतं नाही
जेव्हा मी कपडे धुतो...तेव्हाच ती भांडी घासते
अन जेव्हा मी तिचे पाय चेपतो...
तेव्हाच ती माझ्या टाळक्याला तेल घासते

विवाहित पुरुष खाली मानेने का चालतात...
ते आज मला कळलं आहे
मात्र मित्रहो असं समजू नका....
हे दुष्ठचक्र तुमच्या प्राक्तनातून टळलं आहे

......कैलास गांधी

No comments:

Post a Comment