Tuesday, June 28, 2011

कार्य नसेना नाक्यावरती फलक पाहिजे

कधी प्रसिद्धी ठळक ठळक, कधी भडक पाहिजे
कार्य नसेना नाक्यावरती फलक पाहिजे
...
भगव्यानसोबत निळ्या ऋतूंचा जमाव होईल
थोडा वेळच पुन्हा नव्याने तणाव होईल
तणाव करण्या जमाव करण्या धमक पाहिजे ...

नव्या नव्या गोसीप्सने भरतील पेपर पाने
वृत्तवाहिन्यांची हि होतील नवी दुकाने
फक्त तुझ्याशी जाहिरातींची कुमक पाहिजे

कैलास गांधी

Friday, February 4, 2011

ओळखीचा वाटतो पण आठवत नाही मला...

ओळखीचा वाटतो पण आठवत नाही मला
कोणता हा गाव नक्की ते कळत नाही मला

सोबती असतो सतत नि धीर देतो सारखा
पण चुका घडण्या अगोदर थांबवत नाही मला

एक दहशत नांदते आहे पुन्हा गावामधे
जी घराबाहेर हल्ली पाठवत नाही मला

उंच टॉवर बांधण्यासाठी नसावे सोयीचे
याचसाठी तो घरातून हुसकवत नाही मला

हा नव्हे विवेक माझा हि खरी असहायता
धुमसते जी आत केवळ पेटवत नाही मला

ढाळतो मी अश्रू केवळ जमाखर्च पाहुनी
आसवांची गळती रोजच परवडत नाही मला

बेगडी चेहराच माझा त्यास आहे सोयीचा, जो
फक्त टवके काढतो पण खरडवत नाही मला

वाकलो देवासमोरी हा खरेतर दृष्टीभ्रम
या व्यथांचे बोचके बघ पेलवत नाही मला

....कैलास गांधी