Tuesday, July 13, 2010

निसर्ग व्ही. आर. एस. घेण्यापूर्वी....

ऋतू कधीपासून गेलेत सुटीवर
पाऊस ही उशीरच येतो कामावरती
तारीख उलटली तरीही डिलिवरी नाही म्हणून...
maternity leave वाढते आहे सरींची

दिवस मांडतो आहे calculation
सहाव्या वेतन आयोगाची
आणि रात्रीची फिगर वाढते आहे
T A ...D A ...च्या कॅलरीजनी

फुले ठरवताहेत वेळापत्रक उमलण्याचे
बाजारभावाचा अंदाज लावून
अन... रिटायर्डमेंट नंतर पेन्शन नाही म्हणून
संपावर चालली आहेत झाडे

फळांच्या सर्दी-पडशा वरील लस
बाजारातून गायब करण्यात आलीय... हेतुपुरस्कर..
आणि कीटकांची practice जोरात चालावी म्हणून
manage केले जातेय हवामानाला

दाण्यांचे वजन वाढवण्यासाठी रोपांना
ग्राईप water पाजण्याचा ....सल्ला दिला जातोय कृषी तज्ञांकडून
आणि इमारतींची संख्या वाढल्याने
कुटुंब नियोजनाची सक्ती केली जातेय... शेतांवर

आता,
निसर्ग व्ही. आर. एस. घेण्यापूर्वी
नेमणूक केली पाहिजे मर्जीतल्या निसर्गाची
किंवा निदान तशी जाहिरात तरी छापून आणली पाहिजे
कमी खपाच्या .....वर्तमानपत्रात
निसर्गबळ मंत्रालयाचे निकष बदलण्यापूर्वी ...

....कैलास गांधी

No comments:

Post a Comment