Thursday, March 18, 2010

गाव नाही राहिले खेड्याप्रमाणे...

माणसे ही धावती घोड्याप्रमाणे
गाव नाही राहिले खेड्याप्रमाणे

प्रश्न जर विचारले साधेच सोपे
उत्तरे देवू नको कोड्याप्रमाणे

एक झाला ज्ञानिया हे खूप आहे
वेद तू गावू नको रेड्याप्रमाणे

पाहतो मी वाट तुझ्या पावलांची
पायरीशी ठेवल्या जोड्याप्रमाणे

सागराला कोणती चढली नशाही
सारखा फेसाळतो सोड्याप्रमाणे

थांबलेली का अशी काठावरी तू
मी उथळ नाही तसा ओढ्याप्रमाणे

वाट जी जाते तुझ्या दारावरुनी
गुंतली पायात या बेड्याप्रमाणे

...कैलास गांधी

2 comments:

  1. रे जगा नाही तुझे नुकसान केले

    राहिलो मी मोजल्या भाड्याप्रमाणे..

    लाज ना आली कधी गरिबीस माझ्या

    झोपडीला मानले वाड्याप्रमाणे..

    रोज हे होते असे का भेटताना

    संथ तू अन् मी असा सोड्याप्रमाणे...

    बोलला 'कैलास'थोडे प्रेम वाटू

    लोक पाहू लागले वेड्याप्रमाणे...

    ReplyDelete