Wednesday, February 24, 2010

झेंडा आणि अवधूत

एकेक घोषणाही अदभूत होत आहे
गरीबा अरे तुझी हि समजूत होत आहे

होतात रोज राडे येथे सणाप्रमाणे
हिंसा क्षणाक्षणाला मजबूत होत आहे

सत्कार काल माझा त्यांनी झकास केला
आता लिलाव माझा अब्रूत होत आहे

झेंडा पुन्हा कुणाच्या आता करू हवाली
एकेक माणसाचा अवधूत होत आहे

या देश वैभवाचा वाटा आम्हास नाही
अवघीच वाटणी या बंधूत होत आहे

हे मावळे मराठी वैफल्यग्रस्त झाले
पक्षात फक्त मोठा राउत होत आहे

इसवी सनाप्रमाणे ठेवू नकाच नोंदी
गर्दी उगाच अपुल्या मेंदूत होत आहे

... मधुसूदन नानिवडेकर

Tuesday, February 16, 2010

मी छंदी फंदी..

मी छंदी फंदी...दु:खात आनंदी
...माणसांच्या रानात मला बंदी

मी लुच्चा, लफंगा, चोर, बदमाश
...बेवडा मी
तुझ्या वेणीत माळलेला घमघम
...केवडा मी

मी सांज उषेच्या किरणांनी
विणतो शाल दिवसाची
मी रात्रीस बायको म्हणतो
संध्येस रखेल दिवसाची

मी काळोखाच्या गर्भात
उजेडाच्या खडूने लिहीतो
मी सटवीच्या भाळावर
उद्याचे भविष्य लिहितो

मी हात जोडतो सुर्यास
अन् म्हणतो जाळ मला
सागरास मारतो मिठी
अन् म्हणतो सांभाळ मला

मी कोणत्या अनामिक आवेगाने
काळजात ठोकतो खिळा
ही भूक कोणती अशी
आतड्यास द्या म्हणे पिळा

ह्या कळा घेउन युगांच्या
मी काट्यांच्या चालतो वाटा
काट्यास शोधती पाय
की पायास शोधतो काटा

मी शिंपून धर्मबिंदू
शमवतो तहान रक्ताची
मी विठ्ठलास गडी म्हणतो
रुक्मिणीस दासी भक्ताची

मी छंदी फंदी...दु:खात आनंदी
...माणसांच्या रानात मला बंदी

-कैलास गांधी

Sunday, February 14, 2010

आपला तो बच्चा(न)....


आपला तो बच्चा(न)
दुसऱ्याचा तो खान
एकासमोर तलवार नंगी
दुसरयासमोर म्यान
अस्तित्वाच्या गारुड्या समोर
काढला आहे फणा
वाकली जरी मान
म्हणे,
ताठ आहे कणा !!

.....कैलास गांधी

Monday, February 8, 2010

जोडे आणि पादुका

रामाच्या पादुका ठेवून
भरताने राज्य केले
बंधुप्रेमापायी त्याने
खुर्चीलाही त्याज्य केले
आता मात्र काँग्रेसमध्ये
'जोडे' उचला स्पर्धा आहे
कधी मुंबई ... कधी लातूर
कधी ठिकाण वर्धा आहे
..............
कधी पूर्ण कॅबिनेट ..
कधी मंत्री अर्धा आहे

...कैलास गांधी