Sunday, June 6, 2010

धीर कधीना खचला तरीही या सत्याची जाणीव झाली

ज्याच्या नाराजीने सध्या नवीन वादळ उठले होते
हे शोधा कि आधी त्याचे किती जणांशी पटले होते

बाग जरा नाखुशच होती फुलांनीच समजोता केला
नव्या ऋतूंची वाट पाहुनी रंग फुलांचे विटले होते

पाय मोकळे झाल्यावरती उभा राहिला नवाच गुंता
सुटे, मोकळे होण्यामध्ये हात जरा गुरफटले होते

पुसू नका आरसे उगाचच तोंडावर मारत जा पाणी
रोज नव्या रंगानी मुळच्या चेहऱ्यांना बरबटले होते

जीवानिशी जे गेले त्यांच्या मृतदेहांना नाही वाली
लाड तयांचे झाले ज्यांना थोडेसे खरचटले होते

धीर कधीना खचला तरीही या सत्याची जाणीव झाली
शरीर थोडे थकले होते... पाय जरासे दमले होते

....कैलास गांधी

No comments:

Post a Comment