Monday, April 19, 2010

वाघ झाले संत पाहून हिंस्र झाली मेंढरे...

प्रश्न हि नव्हते समर्पक उथळ होती उत्तरे
सारखे वाटायचे कि हे खरे कि ते खरे

परतण्याच्या पायवाटा प्राक्तनाने खोडल्या
ठेवली चित्रात शिल्लक जीर्ण झालेली घरे

लोकशाहीवर असाही सूड त्यांनी घेतला
वाघ झाले संत पाहून हिंस्र झाली मेंढरे

नाचला मनसोक्त पाऊस रे सुबत्ता यायला, पण
ध्वस्त झालो गाव सांगे पूर जेव्हा ओसरे

आगळा हा निकष लावून लोकगणना जाहली
माणसे नसतील तेथे मोजलेले उंबरे

मोकळ्या नात्यांस जेव्हा संमती होती हवी
काळजीने ग्रासले ते लग्न झाले चेहरे

चक्क आईच्या दुधाचा पाहिला व्यापार तेव्हा
गाय हि गोठ्यात नव्हती, ना तिची ती वासरे

पाहिला मी एक योगी जन्मभर जखमांसावे
वाटले न मग कधीही घाव माझे बोचरे

सापडेन मी मला हीच नाही शाश्वती पण
याचसाठी शोधतो मी अडगळी अन कोपरे

....कैलास गांधी

3 comments:

  1. सापडेन मी मला हीच नाही शाश्वती पण
    याचसाठी शोधतो मी अडगळी अन कोपरे


    faarch chhan...

    ReplyDelete
  2. सापडेन मी मला हीच नाही शाश्वती पण
    याचसाठी शोधतो मी अडगळी अन कोपरे

    ReplyDelete
  3. कविता आवडली. काही ठिकाणि वृत्त पाळले गेले नाही हे मात्र खटकते.
    मोकळ्या नात्यांस जेव्हा संमती होती हवी
    काळजीने ग्रासले ते लग्न झाले चेहरे

    - मस्त.

    ReplyDelete