Thursday, May 27, 2010

मी छंदी फंदी...: काँग्रेसच्या दारावरून...राष्ट्रवादीची वाट आहे

मी छंदी फंदी...: काँग्रेसच्या दारावरून...राष्ट्रवादीची वाट आहे

काँग्रेसच्या दारावरून...राष्ट्रवादीची वाट आहे


काँग्रेसच्या दारावरून
राष्ट्रवादीची वाट आहे
भाजपच्या उपरण्याला
सेनेची गाठ आहे ..
...........
आरपीआय चे निळे द्रव्य
कशातही मिसळते
मराठीच्या लोण्यासाठी
मनसे ताक घुसळते
...........
बसपाचा हत्ती कुठे
एकाजागी बसतो आहे
नवा मित्र खुश तेव्हा
जुना नेमका रुसतो आहे
............
लग्नाप्रमाणे रुसवे फुगवे
राजकारणाचा कणा आहे
पोरगी थोडी नकटी पण,
पोरगा म्हणे देखणा आहे

...कैलास गांधी

Wednesday, May 19, 2010

दाखल्यावर लावण्या पुरता तरी तू बाप दे...

झोंबणाऱ्या पावलांना ठणकणारी ठेच दे
मागण्या उ: शाप आधी एकदा तू शाप दे

घेवूनी हातात काठी चालणे नाहीच मंजूर
रोज घे माझी परीक्षा अडथळ्यांची वाट दे

पोरका होवून जगणे मान्य केलेले परंतु
दाखल्यावर लावण्या पुरता तरी तू बाप दे

देवळांना पोसण्याचा राहू दे त्यांनाच मक्ता
फक्त त्यांच्या जानव्याला विस्मृतीची गाठ दे

जिंकलो जी ती लढाई फक्त लढलो एकट्याने
पण कुणाला बोललो ना हात तू हातात दे

...कैलास गांधी

बायको,मैत्रीण,लफडे...


ट्वेंटी- ट्वेंटी करत करत
एकेक पेग वाढवत गेले
पराभवाचे दु:ख सुद्धा
पबमध्ये उडवत गेले
बायको,मैत्रीण,लफडे,फिक्सिंग
ताण तणाव फार आहेत
तणावमुक्ती साठी म्हणून
जागोजागी बर आहेत
.....कैलास गांधी