Friday, December 18, 2009

प्रकाश घेवून दूर....


अंधारातून तान निघावी सुरेल हिरवी
तशीच यावी तुझी आठवण...अलगद ..अलगद
फेसाळावा उधाणदर्या काळोखाचा...
प्रकाश घेवून दूर निघावे तुझेच गलबत

तुझाच व्हावा भास ऋतूंच्या हुंकारातून
तुझ्याच स्पर्शाने समिंदर फेसाळावा
डोळ्यांमधले गळता हळवे खारे पाणी
गर्भात शिंपला घेवून मोती तेजाळावा

.....कैलास गांधी

वडील गेल्यानंतर...


वडील गेल्यानंतर आता मी...
शोधत रहातो त्यांच अस्तित्व
झाडा, फुला, पानांत...
आजूबाजूच्या प्रत्येक वस्तू...

आता गर्दीतील प्रत्येक वृद्ध व्यक्तीचा चेहरा
मला वाटतो त्यांच्यासारखा...
निर्विकार, समाधानी, ...कोणतीच अपेक्षा नसल्यासारखा.
आता हेलकावत रहाते त्यांची रिकामी आरामखुर्ची...
....नुसतीच वाऱ्यावर..
...अन काळीज हलल्याचे भास होत रहातात सारखे.

वयाच्या पस्तीशीपर्यंत...
माझ्यात जिवंत असलेले लहान मुल..
बापाचा हात सुटल्यासारखं कावरं बावरं झालंय
बिथरला आहे भविष्यकाळ...त्याच्या भूतकाळातील जाणीवांसकट

आता एक मात्र झालंय..
आता शोधावा लागत नाही मला पोरका या शब्दाचा अर्थ
कोणत्या पुस्तकात, शब्दकोशात...
...अथवा एन्सायक्लोपीडीयात देखील
तेवढी समज मला निश्चित आलीय...वडील गेल्यानंतर!

....कैलास गांधी

Monday, December 14, 2009

तुझ्या डोळ्यातून...



तुझ्या डोळ्यातून पाऊस ओघळताना
मी शांत राहतो थोडा वेळच
नंतर लगेचच सुरु होतो
माझ्या डोळ्यातील पावसाचा... तुझ्या डोळ्यातील पावसाशी
मुक्त संवाद

पाऊस ओघळत नाही साऱ्याच डोळ्यातून अन,
डोळ्यातून ओघळणाऱ्या प्रत्येक थेंबास..
पाऊसही म्हणत नाही कुणी
आणि म्हणूनच हा प्रत्येक थेंब ओंजळीत साठवताना...
..मी लावत बसतो त्या प्रत्येक थेंबाचा अर्थ
पण अर्थ तर एकमेकात इतके बेमालूम मिसळलेले
कि अर्थ लावता लावता त्याची गाणी होवून जातात
कधी न संपणारी तुझी माझी कहाणी होवून जातात
तुझ्या डोळ्यातून पाऊस ओघळताना....

कधी कधी पाऊस तूच होवून येतो
अन ठिबकत बसतो माझ्या भेगाळलेल्या मनाच्या कौलातून
हा पाऊस ओंजळीत मावत नाही...
त्यासाठी मनाचं तळं रुंद कराव लागत..
यात तुझ्या आठवणींचा भणाण वर इतका वेगाचा
कि, हेलकाव्यानी हे तळही उतू जायला लागतं
तुझ्या डोळ्यातून पाऊस ओघळताना....

कधी कधी तंद्री लागल्यावर मी लावत बसतो संदर्भ..
तुझा.... पावसाचा ....अन प्रत्येक थेंबाचाही..
पण धाग्यांची गुंतागुंत इतकी वाढत जाते
कि, मी कविताच सोडून देतो अर्ध्यावरती...
...मला चांगलं आठवतंय मी गावी असताना
माझ्या आईच्या डोळ्यातून कोसळणारा पाऊस देखील
असाच शांतपणे पाहत रहायचो..
पण त्या प्रत्येक थेंबाचा अर्थ इतका स्पष्ट असायचा कि
त्यावर कधी कविताच लिहिली नाही

.....कैलास गांधी



बोलतो शब्द वेडा मी....




बोलतो शब्द वेडा मी
बोलतो शब्द थोडा मी
थोडाच बोलतो तरीही
मन हलके हलके होते

अंगणात येते रात
अन चंद्र घराच्या आत
श्वासात मिसळता श्वास
देहात चांदणे विझते

ओढाळ वाहतो ओढा
चौखूर दमाचा घोडा
दगडात अडखळे थोडा
मग पुन्हा येई जोसात

मग पाय फुटे वाटांना
स्वप्नात दूर जाताना
भेटता उजेड थोडा
अंधार जाणता होतो

....कैलास गांधी

Saturday, December 12, 2009

जपून ठेवलेत मी




जपून ठेवलेत मी तुझे अजून आरसे
लक्ख न दिसे तरी धूसर हि न फारसे

येतसे अजूनही तुझीच लाट अंगणी
उंबऱ्याशी काठ आणि हरवलेली चांदणी

चालली कशासही प्रदक्षणा भोवती
मीही नसे एकटा तुझाही कोणी सोबती

....कैलास गांधी

Thursday, December 10, 2009

तोडली घरटी कुणी रे....


संमत्ती जेव्हा न होती वादळाची
तोडली घरटी कुणी रे पाखरांची

सांत्वनाला कोणीही येणार नव्हते
काढली समजूत त्यांनी आसवांची

चेहरा माझा मला जर ज्ञात आहे
काळजी घेवू कशाला आरशाची

का स्वतावर कृष्ण आता खुश आहे
ओढ राधेला खरेतर बासरीची

गाव मी माझा जरी सोडून आलो
वेस ना ओलांडली तू उंबऱ्याची

लावण्या छातीस माता खुश नाही
बालकाला ओढ वाटे पाळण्याची

सोसले ना लाड ते कंगाल झाले
एवढी मिजास होती लेखणीची

.....कैलास गांधी

मुसाफिर...




घेवूनी पाठीवरी ओझे मुसाफिर चालतो
झोंबणाऱ्या पावलांना सांगतो समजावतो

गाव जे वाटेत येई पावले न थांबती
सावलीला सोडूनी नाते उन्हाशी सांगती
दग्ध झाल्या वादळांना भेटण्या बोलावतो
...झोंबणाऱ्या पावलांना सांगतो समजावतो

पेच आहे ठेच आहे वेदनाही तीच आहे
काळजाच्या अंतराळी तोच मरण पेच आहे
पण धुक्यातून एक तर रोज रस्ता दावतो
...झोंबणाऱ्या पावलांना सांगतो समजावतो

..... कैलास गांधी