Wednesday, December 9, 2009

पाउस काही क्षणचित्रे



उर तटतटून यावा आईचा अन
चांदण्याचा निसटावा थेंब...
तसा टपटपतो पाऊस उस्फुर्त ...अनावर

ते इवले इवले तान्हुले थेंब पानाच्या कडांना लुचतात
अन अख्खं झाड पान्हावत आतून बाहेरून...
तीओल जेव्हा आत खोल देठापर्यंत पोहोचते
तेव्हा झाडाचे डोळे साधर्म्य सांगतात
माझ्या आईच्या वास्तल्य वेल्हाळ डोळ्यांशी

पागोळ्यांच्या मुंडावळ्या बांधलेली कौलारू घर
जगाशी संपर्क तोडून स्वत:तच मश्गुल होऊन जातात
नवीन लग्न झालेल्या जोडप्यांसारखी...

घराच्या गळक्या कौलातून सांडलेला पावसाचा चुकार थेंब
बिनदिक्कत सलगी करू पहातो घरातल्या जमिनीशी
तेव्हा घरातले सारे संस्कृतिरक्षक
तातडीची बैठक बोलावतात यावर उपाय योजण्यासाठी

विज परागंदा होते दूर देशी
अन टेलीफोन जेव्हा शांततेशी गप्पा मारत बसलेला असतो
तेव्हा ज्योतीजवळ साठलेला काळा गारठा दूर सारण्याचा...
केविलवाणा प्रयत्न चालू असतो दिव्याचा

मुंग्या साठवत असतात आपल्या चिमुकल्या घरात
चिमुकले साखरेचे स्फटिक
अन वेडा पावश्या तल्लीन होवून
वेचत असतो मृगाचे कृष्ण कवडसे
तेव्हा अंधाराच्या सीमारेषेवर हिंदकळणारे
एखादे स्वप्नाळू जोडपे ...
आपल्या काजळ डोहात,
भरून घेत असतं तुडुंब पाऊस
पुढचे वर्षभर पुरवून पुरवून वापरण्यासाठी

....कैलास गांधी

Tuesday, December 8, 2009

टक्क डोळे उघडे ठेवून


तिचे sms यावे वाटतात
पण ती करत नाही.
उगाच डोळे भरून येतात
त्यांना का कळत नाही.

टक्क डोळे उघडे ठेवून
जेव्हा मी जागत बसतो
डोक्यावरचा फिरता पंखा
तिचेच वर्तुळ सांधत असतो

आणि अचानक उंबरठ्याशी
ती आल्याचा भास होतो
छातीमधले पिसाट काहूर
अन पंख्याचा श्वास होतो

क्षणभरच ते लगेच कळते
भासच नुसता दुसरे नाही
अन, मग पंखा निमूट बसतो
डोळ्यामधली सुकवीत शाई

...कैलास गांधी

...तर पुढे मागे


परवा माझा मित्र मला म्हणाला कि,
आपण तुझा मेंदूच बदलून टाकू
त्याच्या ऐवजी...
एखादी सिलिकॉन चीप बसवली कि झालं!

म्हणजे काय होईल
तुझी मेमरी पण वाढेल आणि एफिशीअन्सिही!

इंटरनेटचे कनेक्शन मी तुला फ्रीमधे देईन,
म्हणजे,तू इंग्रजीतल्या कविता..
मराठीत ट्रान्सलेट करून...
... स्वताच्या नावावर खपवू शकशील!

समजा बाजारातून तू इंग्रजी टू मराठी
.. आणि मराठी टू इंग्रजी.
असं ट्रान्सलेट करणारं एखादे पेकेज विकत घेतलेस,
तर तू मराठीत एज वेल एज इंग्रजीत...
मोठा कवी म्हणून नावारूपाला येशील।
असो हा भाग वेगळा....

हल्ली मला फार कृत्रिम वाटायला लागलाय.
...हल्ली ती जरी समोरून आली ना
तरी..
हि फाईल कोणती ते मला सर्च करावं लागतं
हल्ली तिच्याशी बोलताना..
मी फार भाऊक वगैरे होत नाही
कारण,
तिच्याशी बोलताना..
ओठावर आलेला प्रत्येक शब्द..
आधीच स्पेलचेक होऊन आलेला असतो.
हे असच चालू राहील ना?
तर पुढे मागे कदाचित...
तिच्या स्पर्शाचे अर्थ समजावणारे,
एखादे पेकेज...
...मला परदेशातून इम्पोर्ट करावे लागेल.
......कैलास गांधी

Monday, December 7, 2009

वारयाने गळावे नकळत....


कपरित जसे फेसाळते पाणी..
तशी येती गाणी तूझ्या ओठी

तलावात जसे तरंगे आकाश..
तसे तुझे श्वास माझ्या देही


आगीच्या पारंब्या भिड़ती आकाशी..
तसे अधाशी तुझे ओठ

उभा देह नुस्ता उधाणला पुर..
आणि अश्वखुर पाय तुझे

वारयाने गळावे नकळत फुल..
तसा जावा जीव तुझ्या काठी

....कैलास गांधी

Saturday, December 5, 2009

हवा पावसाळी


असा गार वारा... हवा पावसाळी
तुझ्या आसवांची हले का? डहाळी


असा कोणता गंध ये आसवांना
मनातून कोणी रुजुवात पाहे
पुन्हा कोंब येती नव्याने बीजाला
मुळामागुनी मूळ निशब्द धावे...
गती येत जाते तुझ्या चिंतनातून...
जुन्या वेदनांना नवी पालवी...


अशी शिळ घाली कोणी मनातून
निळा मेघ सांगे तुझा वारसा
खरे काय ते फक्त डोळ्यास ठावे
तुझा चेहरा हा मला आरसा
नदी खोल धावे ओलावणारी
आणि होत जाती उन्हे कोवळी
- कैलास गांधी

Tuesday, December 1, 2009

नकोस वेडे प्रश्न विचारू......




नकोस वेडे प्रश्न विचारू माझ्यापाशी उत्तर नाही

उघडे पडले घाव जुने तर झाकायाला अस्तर नाही


किती वेळ अन दिवस भेटलो याची कोणी गणती केली

त्या त्या वेळी असे म्हणालो आता भेटू नंतर नाही


बदललास तू सहजच रस्ता आता तो सवयीचा झाला

सवयीचा नक्की झाला कि त्यावाचून गत्यंतर नाही


समीप आलो उगीच वाटले खरे समांतर चालत होतो

किती बदलले रस्ते तरीही आपल्यामधले अंतर नाही


नको दरवळू अशी तू तरी तुझा गंध माझ्यात असुदे

बागेमध्ये फुल व्हावया माझ्यापाशी अत्तर नाही


......कैलास गांधी

Thursday, November 12, 2009

वादळानंतर दापोली....


वादळानंतर दापोलीची पडझड झाली तरीही पुन्हा नव्याने उभे राहण्यासाठी प्रत्येक जण कार्यरत झाला. अनेक मदतीचे हात पुढे आले. जनजीवन पूर्णपणे सुरळीत झाले नाही तरी पुन्हा नव्या सुरुवातीला सुरुवात झाली. अशावेळी माझ्या प्रकाश सावंत या कवी मित्राची कविता आठवली
कर तांडव सांडव महापूर अश्रूंचा
उधळून तक जा जीवनपट तू आमचा
वलयांकित होवुनी प्रलय देवूनी जा तू
कर दिशाहीन अन क्षितिजे घेवून जा तू
जमवण्या पुन्हा बघ सहस्र कर हे उठले
नमवण्या तुला बघ अंकुर कितीदा फुटले
आम्ही पुन्हा उभारू दिशा नव्या... क्षितिजे नवी
उदयास यावया वाट पाहतो रवी