
बारामतीतील हत्तींना म्हणे
घराणेशाही खपत नाही
खायचे दात लपवले तरी
बाहेरचे सुळे लपत नाहीत
-कैलास गांधी
मी छंदी फंदी...दु:खात आनंदी
...माणसांच्या रानात मला बंदी
मी लुच्चा, लफंगा, चोर, बदमाश
...बेवडा मी
तुझ्या वेणीत माळलेला घमघम
...केवडा मी
मी सांज उषेच्या किरणांनी
विणतो शाल दिवसाची
मी रात्रीस बायको म्हणतो
संध्येस रखेल दिवसाची
मी काळोखाच्या गर्भात
उजेडाच्या खडूने लिहीतो
मी सटवीच्या भाळावर
उद्याचे भविष्य लिहितो
मी हात जोडतो सुर्यास
अन् म्हणतो जाळ मला
सागरास मारतो मिठी
अन् म्हणतो सांभाळ मला
मी कोणत्या अनामिक आवेगाने
काळजात ठोकतो खिळा
ही भूक कोणती अशी
आतड्यास द्या म्हणे पिळा
ह्या कळा घेउन युगांच्या
मी काट्यांच्या चालतो वाटा
काट्यास शोधती पाय
की पायास शोधतो काटा
मी शिंपून धर्मबिंदू
शमवतो तहान रक्ताची
मी विठ्ठलास गडी म्हणतो
रुक्मिणीस दासी भक्ताची
मी छंदी फंदी...दु:खात आनंदी
...माणसांच्या रानात मला बंदी
-कैलास गांधी