Friday, May 24, 2013

पाऊस ही उशीरच येतो

ऋतू कधीपासून गेलेत सुटीवर पाऊस ही उशीरच येतो कामावरती तारीख उलटली तरीही डिलिवरी नाही म्हणून... maternity leave वाढते आहे सरींची दिवस मांडतो आहे calculation सहाव्या वेतन आयोगाची आणि रात्रीची फिगर वाढते आहे T A ...D A ...च्या कॅलरीजनी फुले ठरवताहेत वेळापत्रक उमलण्याचे बाजारभावाचा अंदाज लावून अन... रिटायर्डमेंट नंतर पेन्शन नाही म्हणून संपावर चालली आहेत झाडे फळांच्या सर्दी-पडशा वरील लस बाजारातून गायब करण्यात आलीय... हेतुपुरस्कर.. आणि कीटकांची practice जोरात चालावी म्हणून manage केले जातेय हवामानाला दाण्यांचे वजन वाढवण्यासाठी रोपांना ग्राईप water पाजण्याचा ....सल्ला दिला जातोय कृषी तज्ञांकडून आणि इमारतींची संख्या वाढल्याने कुटुंब नियोजनाची सक्ती केली जातेय... शेतांवर आता, निसर्ग व्ही. आर. एस. घेण्यापूर्वी नेमणूक केली पाहिजे मर्जीतल्या निसर्गाची किंवा निदान तशी जाहिरात तरी छापून आणली पाहिजे कमी खपाच्या .....वर्तमानपत्रात निसर्गबळ मंत्रालयाचे निकष बदलण्यापूर्वी ... ....कैलास गांधी

Wednesday, November 28, 2012

वेदनांची शब्दचित्रे

मी नुकताच एम. एस्सी. रसायनशास्त्र विभागाच्या समन्वयक पदाचा कारभार स्वीकारला होता. मागील पानावरून पुढे या न्यायाने जुन्या व्याख्यात्यांना निमंत्रणे पाठवणे आदी बाबी सुरु झाल्या होत्या. हे काम सुरु असतानाच मला फोन आला... मी गंगाधर मेश्राम बोलतोय... आपले पत्र आलेले नाही... पण मी पुढच्या आठवड्यात कोकणात येतोय ... बघा कसं जमतंय तुमच्याकडे!. मी लगेचच त्यांना हो म्हटले आणि विसरून गेलो. यथावकाश मेश्राम सर आले. त्यांची लेक्चरही संपली. दुपारी त्यांना घेवून जेवायला हॉटेलात गेलो कारण तीनची गाडी पकडायची होती. पोहचे पर्यंत दोन वाजून गेले होते. पण हॉटेल बस स्थानकाजवळ असल्यामुळे तशी चिंता नव्हती. जेवण सुरु करण्यापूर्वी मेश्राम सरांनी एक पुस्तक हातात दिलं. ‘जाणिवेचे हायकू’ नावाचे. म्हणाले एका कविला एका कवीकडून सप्रेम भेट तो पर्यंत सर कविता करतात हे माझ्या गावीही नव्हतं. पुस्तकाच्या पहिल्याच पानावर लिहिले होतं. प्रिय मित्र प्रा. कैलास गांधी यांना सस्नेह , ३ नोहेंबर, २०११, गंगाधर मेश्राम. वेळेत बस पकडायची याचा ताण होताच, पण त्या मोजक्या क्षणात जे काही या हृदयीचे त्या हृदयी झाले त्याने भावबंध घट्ट झाले. स्थानकावर पोचलो तेव्हा गाडी फलाटावर लागलेली होती. त्यामुळे पुढे संवाद खुंटला. त्या रात्रीच साराचे पुस्तक वाचायला घेतलं. ‘जाणिवेचे हायकू’ असे नाव असले तरीही शिरीष पै यांनी प्रस्तावनेत यातील अनेक रचना हायकू नाहीत असे नमूद केलेले. हायकू हा प्रकार मला न उमजलेला कविता प्रकार म्हणण्यापेक्षा मी त्याच्या वाट्यालाच गेलेलो नाही हे अधिक सत्य असल्याने खूप उस्तुकता होती. आकाशात झेपावला पाखरांचा थवा आणि सूर्य मावळला या पहिल्याच रचनेने सुखावलो गेलो. हायकू वाचले होते. त्याच्याशी समांतर जाणारी हि रचना होती. मात्र नंतर लक्षात आले कि हा कवी आपल्या आत खद्खद्णारी वेदना व्यक्त करतोय आणि त्यासाठी त्याने तीन ओळींचा सुटसुटीत प्रकार निवडलाय. मात्र कुठलाही अभिनिवेश नाही आदळआपट नाही फक्त मोकळ होणं. भाकरीसाठी दिवसभर वेचते सरवा... ओम्बी पोरगं दुधास झोंबी ........................... गावची पायवाट शहरात आली खालचे वर ...वरचे खाली ............................ दाणे टीपती चिमण्या अंगणी एक चिमणी मागे फिरली का तिलाही जात कळली? अश्या अनेक रचना खोल रुतायला लागल्या. लक्षात यायला लागले.सामाजिक जाणिवेच संचित या प्रत्येक रचनेत ठासून भरलय. शहरच वास्तव उलगडताना म्हणूनच ... रात्रीच्या जागरणान दिवे किती थकले एका क्षणात झोपले या मोजक्या शब्दांपेक्षा कवीला अधिक फापटपसारा मांडावा लागत नाही. गावचं वास्तवही तितक्याच स्वाभाविकपणे अंगावर धावून येते. सकाळी सकाळी पानावर कुठून मोती पडले रात्रभर कोण रडले. .................. गरीबाच्या पोरीचं वय सोळा गावात गिधाड झाली झाली गोळा ................. थापते माय कुकुसाची भाकर बाप पाटलाचा चाकर अशा रचना वादळासारख्या मनावर आदळत जातात... आणि वाटायला लागतं तीन ओळीच्या गाभ्यात या कवीने मराठी कवितेचे आकाश अधिक मोकळे केलेय. मर्यादा स्वीकारूनही चौकटीबाहेरच अनुभवविश्व चौकटीत मांडताना अभिव्यक्तीला कुठेही फाटा दिलेला नाही. यामुळे या रचना डंख मारत नाहीत पण विचार करायला भाग पाडतात. अंतर्मुख करताहेत हि जाणीव घट्ट झाली. आणि मी रचनांच्या प्रेमात पडलो कलियुगाचा बोलबाला दिवस जाताच बायकोला एडमिशन चे बोलून आला ................................ संपली साठी आयुष्याची चालली कसरत दोरीवर पी.पी.एफ. संपलं पोरीवर अश्या मध्यमवर्गीय जानिवांनाही या रचना भिडत होत्या. बाबासाहेबांच ऋण ... ओसाड वस्तीत बाबांच्या खुणा जीवन हसले पुन्हा असे विनम्रपणे मांडतानाच हा कवी म्हणतो बाबांच्या नावावर कुठवर शेकणार पोळी जनता नाही भोळी. आणि इथवरच न थांबता थेट हल्ला करतो तोकड्या हातांनी बाबा कुठवर भांडू सरदारच निघाले गांडू ! पुस्तक वाचून संपतं तेव्हा रात्रीचे पावणेतीन वाजलेले असतात. बायकोचा आवाज येतो झोपायचं नाही का? या रचनांनी उद्दीपित केलेल्या जाणीवा डोक्यात घोंघावत असतातं. झोप येण अशक्य असतं. मी सोपस्कार म्हणून गादीवर पडतो. कवितेसाठी आणखी एक जागरण करण्याच्या तयारीत. --- कैलास गांधी

Friday, September 14, 2012

कोकणचे साप....

सरस्वतीचा दिवा लागता... परशुरामाच्या चरणी. मंगेशाची 'शुगर' वाढली... लगेच केली 'करणी' कुणास वाटे 'मोह' जातीचा... कुणास वाटे 'शोक' ढुंगण झाले लाल टोचूनी... जातीपातीचे टोक. लांब 'देश' अन दूरच 'पल्ले'... त्यात लागली धाप. उंदीर पाहून भांडत बसले... 'कोकणचे' मग 'साप' ....कैलास गांधी

Friday, February 24, 2012

कर्णबधीर कळ्या फुलांचे ‘आनंदी झाड’ !!



शिकविता भाषा बोले कैसा पाही ,
कानाने बहिरा मुका परी नाही

ही काव्यपंक्ती शब्दश: खरी करत कर्णबधीर चिमुरड्या कळ्या, फुलांसाठी आनंदाचे झाड बनण्याचे काम दापोलीतील स्नेहदीप या संस्थेने केले आहे. यामुळेच ही संस्था चालवीत असलेल्या इंदिराबाई वामनराव बडे कर्णबधीर विद्यालयाचा जेष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक यांनी माणुसकीतील सौंदर्याचा विलक्षण हृदयस्पर्शी अविष्कार असा उस्फुर्त गौरव केला आहे.
या संस्थेची १९८४ साली झालेली स्थापना दापोलीतील संवेदनशील सामाजिक जाणीवेची प्रचीती देणारी आहे. त्या काळात शहरातील डॉ. गंगाधर काणे यांना परिसरात असलेल्या कर्णबधीर मुलांचे लक्षणीय प्रमाण लक्षात आले. यामुळे अशा मुलांसाठी शाळा आवश्यक असल्याचे जाणून त्यांनी हा विषय डॉ. श्रीधर कोपरकर, शांता सहस्रबुद्धे यांच्या कानावर घातला. डॉ. काणे व डॉ. कोपरकर यांनी संस्था स्थापन करण्यासाठी माणसांची गोळा बेरीज सुरु केली. बापू घारपुरे, दांडेकर गुरुजी, पांडुरंग भावे, डॉ. वासुदेव पापरिकर, अरुण साबळे, संतोष मेहता, बाभुभाई जैन, मधुसूदन करमरकर, डॉ. अपर्णा मंडलिक, अशी सर्व मंडळी एकत्र आली. डॉ. गंगाधर काणे, शांता सहस्त्रबुद्धे, डॉ. कोपरकर यांनी घटना तयार केली. तर डॉ. पापरिकर यांनी कर्णबधिरांच्या सर्वेक्षणाचा उपक्रम हाती घेतला.
संतोष मेहता व अरुण साबळे यांनी लायन्स क्लबच्या माध्यमातून कर्णबधिरांच्या नाव , पत्यासाठी अक्षरशः तालुका पिंजून काढला. डॉ. काणे यांच्या अश्विनी हॉस्पिटल मध्ये कर्णबधीरांची नोंदणी झाली. मुलांच्या पालकांशी हितगुज साधल्यानंतर १२ जुलै १९८४ रोजी स्नेहदीप दापोली संचलित इंदिराबाई वामनराव बडे कर्णबधीर विद्यालयाचा पहिला दिवस उजाडला. शरयू तेरेदेसाई यांचा अनुभव त्या जेव्या स्वता:च्या शब्दात सांगतात तेव्हा २८ वर्षापूर्वीचे चित्र डोळ्यासमोर उभे राहते. सकाळचे १० वाजलेले शाळेचा पहिला दिवस त्यामुळे संस्थेची मोजकी पाच माणसे आणि पाच मुले व त्यांचे पालक अशी परिस्थिती... काय करायचे, काय करावे हेच न कळल्याने मुले व पालक गोंधळलेले... संपूर्ण वातावरणात संभ्रमावस्था ...त्यात शाळेसाठी भाड्याची खोली आणि रडणारी, लाथा झाडणारी मुले अशी दिवसाची सुरुवात झाली. खरेतर त्यावेळी या अगोदर रत्नागिरीत अश्या प्रकारची शाळा एकमेव शाळा अस्तित्वात होती. त्यामुळे कर्णबधिरांसाठी शाळा हा उपक्रम तसा नवा होता. पण आधाराला माणसे उभी राहिली आणि वर्ष सरते न सरते तो शाळेचे वसतीगृह देखील सुरु झाले. आज रौप्यमहोत्सव साजरा केलेल्या या संस्थेचा पसारा वाढला आहे.
शासनाच्या विविध अनुमतींचे शिक्कामोर्तब झाले असून या संस्थेचे स्वप्न पाहणाऱ्या कै. डॉ. काणे यांच्या नेतृत्वाचा वारसा आता डॉ. प्रशांत मेहता, सौ. शुभांगी गांधी तितक्याच समर्थपणे पाहत आहेत. संस्थेची स्वताची जागा, त्यावरच्या इमारती, सुसज्ज कार्यशाळा, कर्णबधिरांसाठी शैक्षणिक साहित्य समजली जाणारी अत्याधुनिक यंत्रसामग्री आदींनी हे विद्यालय सुसज्ज झाले आहे. हे सर्व उभे करण्यासाठी डॉ. इंदुभूषण बडे, सुधाकर साबळे, पुष्पा मेहेंदळे, संतोष मेहता, कमल वराडकर आदी संवेदनशील व्यक्तींचा आर्थिक हातभार लागला आहे.
आज २८ वर्षात हे झाड आनंदाने डवरले असून इतर सामान्य मुलांप्रमाणे ही मुले शिकत आहेत. येथील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी ही शाळा म्हणजे एक कुटुंब झाले असून या मुलांच्या सुखदु:खात हे कर्मचारी समरस झाले आहेत. यामुळेच या शाळेतून शिक्षण आणि व्यावसाईक शिक्षण घेतलेली मुले आज नोकरी आणि व्यवसाय स्वबळावर आत्मविश्वासाने करीत आहेत. हेच या संस्थेच्या कामाचे फलित आहे. विद्यालयात अक्षर ओळख करतानाच मुलामुलीना शिवणकाम, भरतकाम, कपड्यावर पेंटिंग करणे, मेणबत्या, खडू व ऑफिस फाईल बनवणे, साबण, फिनेल, अत्तरे, आकाशकंदील, राख्या तयार करणे आदी व्यावसाईक शिक्षण ही दिले जात आहे. यामुळे चित्रकला, तसेच मैदानी क्रीडा प्रकारात देखील राष्ट्रीय स्तरावर विद्यार्थ्यांनी पारितोषिके पटकावली आहेत.
.... कैलास गांधी

Tuesday, June 28, 2011

कार्य नसेना नाक्यावरती फलक पाहिजे

कधी प्रसिद्धी ठळक ठळक, कधी भडक पाहिजे
कार्य नसेना नाक्यावरती फलक पाहिजे
...
भगव्यानसोबत निळ्या ऋतूंचा जमाव होईल
थोडा वेळच पुन्हा नव्याने तणाव होईल
तणाव करण्या जमाव करण्या धमक पाहिजे ...

नव्या नव्या गोसीप्सने भरतील पेपर पाने
वृत्तवाहिन्यांची हि होतील नवी दुकाने
फक्त तुझ्याशी जाहिरातींची कुमक पाहिजे

कैलास गांधी

Friday, February 4, 2011

ओळखीचा वाटतो पण आठवत नाही मला...

ओळखीचा वाटतो पण आठवत नाही मला
कोणता हा गाव नक्की ते कळत नाही मला

सोबती असतो सतत नि धीर देतो सारखा
पण चुका घडण्या अगोदर थांबवत नाही मला

एक दहशत नांदते आहे पुन्हा गावामधे
जी घराबाहेर हल्ली पाठवत नाही मला

उंच टॉवर बांधण्यासाठी नसावे सोयीचे
याचसाठी तो घरातून हुसकवत नाही मला

हा नव्हे विवेक माझा हि खरी असहायता
धुमसते जी आत केवळ पेटवत नाही मला

ढाळतो मी अश्रू केवळ जमाखर्च पाहुनी
आसवांची गळती रोजच परवडत नाही मला

बेगडी चेहराच माझा त्यास आहे सोयीचा, जो
फक्त टवके काढतो पण खरडवत नाही मला

वाकलो देवासमोरी हा खरेतर दृष्टीभ्रम
या व्यथांचे बोचके बघ पेलवत नाही मला

....कैलास गांधी

Monday, August 2, 2010

Enjoying mansoon with with किशोर कदम (सौमित्र)

Enjoying mansoon with with किशोर कदम
(सौमित्र)
खूप खूप फिरलो...दापोली, गुहागर, चिपळूण.... तुडुंब पाऊस ,
जगजीत सिंगच्या गझल..गालिब आणि किशोरच्या कविता साक्षात त्याच्याच
तोंडून आणखी काय हवे?
...गुहागरात पाहिजे तसे लॉज सापडले नाही मग वेळणेश्वर...हेदवी...पण तिथेही
तीच स्थिती मग शेवटी वैतागून चिपळूण गाठले...

नटरंग नंतर किशोर खूप बिझी झालाय पाहूया परत असा कधी योग येतो